जत तालुका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत! | नदी,नाले,तलाव मृतसंचयखाली ; भुरभूरने खरीपाची पिके तरली

माडग्याळ, संकेत टाइम्स : पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले,तरीही जत पश्चिम भाग वगळता संपूर्ण तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पडलेल्या केवळ भुरभुरू पावसावर खरीप पिके जरी तग धरून असले तरी,अद्यापपर्यंत तालुक्यात एकही दमदार पाऊस न पडल्यामुळे येथील एकमेव असलेली बोरनदी,संख मध्यम प्रकल्प आणि तलावे,ओढे,नाले व विहिरींची पाणी पातळी खालावली आहे.तर म्हैसाळ पाणी योजना लाभक्षेत्रातील तलाव वगळता विशेषतः पूर्वभागातील बहुतांश तलाव मृतसंचयाखाली तर काही तलाव गेल्या उन्हाळ्यापासून कोरडेच असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 एकीकडे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कृष्णा आणि वारणा नदीच्या काठी महापूर आलेला आहे. अतिवृष्टीमुळे नागरिक त्रस्त आहेत तर याऊलट जत सारखा दुष्काळी पट्टा मात्र दमदार पावसाअभावी नेहमीप्रमाणे कोरडा पडला आहे. दमदार पाऊस केव्हा पडणार? या प्रतिक्षेत येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
 

जत तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने बाजरी, मका, मूग, भुईमूग, उडीद, तूर, सूर्यफुल मटकी, हुलगा आदी पिकांची लागवड केली आहे. एकूण तालुक्यात 64 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून, पैकी निश्चित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.या खरीप हंगामातील कडधान्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना थोडेफार आर्थिक सहाय्य मिळते.तालुक्यात आतापर्यंत जेमतेम पाऊस पडला असून संपूर्ण तालुक्यात गेल्या अडीच महिन्यापासून एकही दमदार पाऊस न पडल्यामुळे व अतिशय कमी पावसामुळे हवामानात सातत्याने बदल होत असून या बदलामुळे शेतातील पिकांवर आणि लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. 

यंदाच्या हंगामातील खरिप पिके मात्र वेळोवेळी झालेल्या किरकोळ पावसावर तग धरून आहे.त्यामुळे बाजरी सारखी खरीप पिके जरी चांगली असली तरी बागायत फळपिकांना मात्र पाणी होईल असा पाऊसमान नसल्याने शेतकऱ्यांमध्ये घालमेल सुरू आहे.
गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि धरणक्षेत्रात सुरू असणा-या मुसळधार वृष्टीमुळे धरणे भरून नद्यांना पूर आले असतानाच कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक असणा-या जत भागात यंदाही पावसाची अवकृपा झाल्याने या भागात दुष्काळी प‍रीस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे पाण्यापासून बचाव करण्यासाठी स्थलांतर सुरू असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याची परिस्थिती आहे. 


कृष्णानदीकाठी असणा-या सांगली जिल्हात सध्या असे परस्पर विरोधी‍ चित्र निर्माण झाले आहे. जून, जूलै महिनाही दमदार पावसाअभावी कोरडा गेल्याने जत तालुक्याच्या पूर्वभागातील तलाव, विहीरी,शेततळी तसेच अन्य ठिकाणचे पाणीसाठेही संपले आहेत. सलग चार वर्षांपासून कमी आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे जत तालुक्याची अवस्था अधिक बिकट बनत चालली आहे शिवाय मुळात‍च हा भाग अवर्षणप्रवण असल्याने पर्जन्यमान कमी आहे. जत तालुक्यात आत्तापर्यत केवळ जेमतेम पावसाची नोंद झाली आहे.