शरण हडपद आप्पाण्णा, वीर शिवाजी काशिद यांची पुण्यतिथी साजरी
उमराणी : जत विद्यानगर येथील संत सेना महाराज मंदिरात विश्वगुरु बसवण्णांचे सल्लागार हडपद आप्पाण्णा व वीर शिवाजी काशिद यांची पुण्यतिथी संयुक्तपणे जत तालुका नाभीक संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना तुकाराम माळी म्हणाले की,गुरू बसवण्णा यांनी स्त्री आणि पुरुष यांच्या मधील भेदभावामुळे आपल्या पेक्षा जेष्ट असलेल्या बहिणीची मुंज नकरता माझी मुंजीचा आग्रह का धरता म्हणून बंड करून घर त्याग केला. वयाच्या आठव्या वर्षी घर त्याग करून कुडलसंगम येथील ईशान्य गुरूंच्या आश्रमात विद्याभ्यास केला.वयाच्या विसाव्या वर्षी बलदेव मामांच्या मुलीशी विवाह झाल्यानंतर मंगळवेढा येथील बिजल राज्याच्या दरबारात कर्णिक म्हणून सेवा करु लागले. बसवण्णांचे काम पाहून बिजल राज्याने बसवण्णांना भांडारपाल पदी बढती दिली.
माळी म्हणाले,बसवण्णांना समाजातील विषमतेबद्दल खंत होती म्हणून त्यांनी समताधिष्ठित समाज निर्माण केला. पुढे बसवण्णा मंगळवेढ्याहून कल्याणला आले. त्याठिकाणी ७७० शरण शरणी यांना प्रशिक्षण देऊन अनुभव मंटप सुरू केला. अनुभव मंटपात अनुभवावर आधारित वचने लिहिली. कल्याण येथे अतिशय विध्वान असे नाभीक समाजाचे हडपद आप्पाण्णा यांनी बसवण्णांना सहाय्यक म्हणून काम केले. कल्याणक्रांती नंतर बसवण्णा कल्याणहून कुडलसंगमला आले,परंतू हडपद आप्पाण्णा कल्याण मध्येच राहिले. बसवण्णांनी वैदिक धर्मास विरोध करून लिंगायत धर्माची स्थापना केली. हडपद आप्पाण्णांनी लिंगायत धर्माची दिक्षा घेतली होती. पुढे कल्याण क्रांतीनंतर लिंगायत धर्म आचरण बसवतत्वाप्रमाणे होत नव्हते. बसवण्णा आणि हडपद आप्पाण्णा यांनी लिंगायत धर्माचा प्रसार प्रचार केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष जयवंतराव सुर्यवंशी तात्या म्हणाले की वीर शिवाजी काशिद यांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मिती मध्ये मोठे योगदान दिले. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार झाला.आजचा दिवस शिवाजी काशिद यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. तसेच यापुढे जत तालुका नाभीक संघटना ओबीसी प्रवर्गातील घटक म्हणून सक्रीय काम करेल.यावेळी नाभीक समाजातील बंधु भगिणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज येळवी चे नूतन प्राचार्य नंदकुमार खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हाजी मुबारक नदाफ, तुकाराम माळी, रवींद्र सोलनकर, अल्लाबक्ष मुल्ला, मल्लिकार्जुन काराजणगी,नाभीक समाज अध्यक्ष जयवंतराव सुर्यवंशी, राजू काळे मणेराजुरी,मधुकर गायकवाड सावळज,विश्वनाथ व्हणे,नितीन खंडागळे अंकलकोप,विशाल गायकवाड खुजगांव,राम बनकर, नाभीक संघटना जत तालुका अध्यक्ष श्रीधर वाघमारे, सुभाष क्षीरसागर, तासगाव तालुका अध्यक्ष गायकवाड, श्रीकांत सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते