जत,संकेत टाइम्स : जतचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह सांवत यांची सांगली जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यात जतचा दबदबा वाढला आहे.
तत्कालीन सातारा लोकसभेचे खासदार राजे विजयसिंह डफळे यांच्या नंतर तब्बल चार तपानंतर जत तालुक्यातील नेत्याला कॉग्रेस पक्षाची जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एका बँकेचे शाखाधिकारी ते जतचे आमदार असा मोठा संघर्ष केलेले आमदार विक्रमसिंह सांवत यांना पक्ष नेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे.
जत तालुक्यातील सिंचन योजनासह विविध विकास योजनासाठी सरकारकडे पोटतिडकीने आक्रमक भूमिका मांडणारे दुष्काळी भागाचे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे.
कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला जत विधानसभा मतदार संघ मोदी नावाची सुनामी असतानाही आ.सांवत यांनी भाजपाकडून मोठ्या मताधिक्याने परत मिळविण्याची किमया त्यांनी साधली होती.
त्यांची दखल राज्य पातळीवरील नेत्यांनी घेतली असून या निवडीमुळे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे कॉग्रेस पक्षातील महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.आ.विक्रमसिंह सावंत यांना यानिमित्ताने जिल्ह्यात जत तालुक्याचा दबदबा वाढविण्याची संधी मिळाली आहे.
सांगली जिल्हा कॉग्रेसचा गढ आहे,तो पुन्हा कॉग्रेसमय करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पक्षाची ताकत वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहिल.सांगलीसह जिल्ह्यातील तालुक्यात कॉग्रेस कार्यकर्त्यांची मजबूत मोट बांधू,असे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.