अकरा वेळा आमदार होण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांची आज वयाच्या 94 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा श्रद्धांजलीपर लेख खास आमच्या वाचकांसाठी...
गेल्या तीन चार दिवसापासून एक धाकधूक साऱ्या महाराष्ट्राच्या मनात होतीच. अनेकदा समाज माध्यमातुन भाई गणपतराव देशमुख गेल्याच्या बातम्या यायच्याआणि पुन्हा काही क्षणात ही बातमी अफवा आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असे संदेश वाचायला मिळायचे. काल रात्री बराच वेळ पुन्हा एकदा असाच संदेश मी समाज माध्यमातून वाचला आणि रात्री बराच वेळ तो पुन्हा अफवा असल्याचा मेसेज पडेल या अपेक्षेने जागत राहिलो. पण धडाधड आबासाहेब गेल्याचे आणि त्यांना श्रद्धांजलीचे मेसेज पडत राहिले.
आजही मी अनेक वाहिन्यांवरून त्यांची अंत्ययात्रा पाहताना हातातल्या मोबाईलकडे पाहतो आहे आणि अफवा असल्याची बातमी येईल का? याची वाट पाहतो आहे. एक-दोन वेळा नाही तर तब्बल अकरा वेळा एकाच पक्षातून आणि एकाच मतदार संघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाण्याचा जागतिक विक्रम ज्यांच्या नावावर होता ते भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब. आबासाहेबांनी वयाच्या 94 व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी महाराष्ट्र आबासाहेबांना पुढची अनेक शतके एक वृत्तस्त म्हणूनच लक्षात ठेवेल. राजसत्ता की केवळ जनतेच्या सेवेसाठी असते, याचा जिताजागता वस्तुपाठ म्हणजे सांगोल्याचे गणपतराव देशमुख होते.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अर्धशतकाहून अधिक काळाची आमदारकी त्यांनी मतदार आणि सामान्य गरजू माणूस यांना मध्यवर्ती धरून कार्य केले. इतकी वर्षे आमदारकी, काही काळ मंत्रीपद, मान-सन्मान मिळाल्यानंतर आज त्यांची संपत्ती काय? असा जर कोणी प्रश्न विचारला, तर आज त्यांना निरोप देताना वाहणारा अश्रूंचा महापूर पाहायला सांगावे. वयाच्या नव्वदीनंतरही शेतकऱ्याच्या बांधावर बसून जेवणारा आणि प्रसंगी रात्रभर पाठाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांसोबत कॅनोलवरच झोपणारा हा अवलिया केवळ माणूस नव्हता तर तो एक महामानवच होता. सहकार म्हणजे म्हणजे स्वाहाकार बनत चाललेला असताना एक सहकारी सूतगिरणी नफयात चालते हे कोणालाच न पटणारे वास्तव आबासाहेबांच्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वानेही सिद्ध केले आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन वकिलाचा अभ्यास पूर्ण केला आणि याच काळात त्यांनी स्वतःला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता बनवले. विद्यार्थी दशेत शेतकरी कामगार पक्षाचे चालू केलेले काम अखेर त्यांनी काल शेवटच्या श्वासापर्यंत टिकवले. दुष्काळी भागातल्या जनतेच्या पाण्याचा लढा नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या सहकार्याने लढण्यात आबासाहेब अग्रभागी होते. सांगोल्याला डाळिंब पिकवणारा भाग म्हणून केवळ देशाचाच नाही तर जगाच्या नकाशावर नेण्याचे कामही आबासाहेबांमुळे झाले. राष्ट्रीय पातळीवरचे डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर जिल्ह्याला मिळाले तेही आबासाहेबांचा कर्तुत्वाचे फलित आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नाला उत्तर शोधायला आणि त्यांच्या वेदना जाणून घ्यायला वेळ मिळावा म्हणून मंत्रिपदाची माळ बाजूला काढून ठेवणारा राजकारणी आता यापुढे केवळ इतिहासाच्या पानावरून आढळेल.
सत्ता असो वा नसो, आबासाहेब हीच एक सत्ता ठरावी असा तो काळ होता. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षीय उलथापालथ अनेकदा अनेकांनी अनेक केल्या. पण आबासाहेब हा दीपस्तंभ कधीही डळमळला नाही. या उलट प्रत्येक वादळात तो अधिक कणखर आणि खंबीर बनत राहीला. या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो. आबासाहेब म्हणजे सत्ताधार्यांचे सत्ताधीश होते, याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. कृष्णा नदीचे पाणी जतच्या शिवारात येण्यासाठी कवठेमंकाळ आणि जत या तालुक्याच्या हद्दीवर बोगद्याचे काम पूर्ण होणार म्हणून एका शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सरकार होते. या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातले दोन मंत्री उपस्थित राहणार होते. स्वर्गीय आर. आर. आबा आणि डॉ. पतंगराव कदम. या दोन्ही मंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले आणि ते व्यासपीठावर विराजमान होण्यास गेले.
त्यांनी व्यासपीठावरून प्रेक्षकात पाहिले आणि काय आश्चर्य, दोघेही जाग्यावर उभा राहून प्रेक्षकातल्या कोणालातरी व्यासपीठावर येण्याचा आग्रह करू लागले. प्रेक्षकातून पोलिसाच्या गराडयात एक व्यक्ती बाहेर आली आणि व्यासपीठाकडे चालू लागली. पायात साधी चप्पल, पांढरी विजार, पांढरा शर्ट घातलेल्या एका वयस्कर व्यक्तीला पोलिस व्यासपीठावर घेऊन गेले. दोन्ही मंत्री या व्यक्तीच्या व्यासपीठावरील आगमनाची प्रतीक्षा करत उभे होते. ती व्यक्ती व्यासपीठावर येताच स्वर्गीय आर. आर. आबा आणि डॉ. पतंगराव कदम यांनी नतमस्तक होत या व्यक्तीला अभिवादन केले. वाचकहो! ही व्यक्ती होती भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचा परिपाठ असणाऱ्या या लोकनेत्याने भारतीय राजकारणात एक नवा आदर्श घालून ठेवला आहे. स्वार्थ हा शब्द आबासाहेबांच्या शब्दकोशात शोधूनही कधी कोणाला सापडणार नाही. शिक्षण क्षेत्रात ते कर्मवीर आण्णांचे विचार वारस म्हणून वागत होते. सहकार क्षेत्रात विखे पाटलांचे विचार आचरणात आणत होते. शेतीच्या क्षेत्रात त्यांना स्वामीनाथन गुरु वाटायचे.
पाण्यासाठी महाराष्ट्रात पाण्यासारखा पैसा शासन खर्च करीत असताना पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही असा निग्रह करून डोंगरमाळावर बागा बनवण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी ते सतत शेतकऱ्यांसोबत असायचे. देशातली पहिली भाजीपाला किंवा फळे नेणारी रेल्वे सांगोल्यातून चालवण्याचा मानही या भागातल्या जनतेला मिळवून दिला. वारसा हक्काने मिळालेली सत्ता यापेक्षा कर्तुत्वाने मिळालेले यश चिरकाल टिकणारे असते हा विचार अमंलात आणणारे, सामान्यातल्या सामान्य माणसालाही स्वतःच्या घराची दारे कायम ठेवणारे एक घर आज पोरके झाले आहे. वैद्यकीय व्यवसायाचा अभ्यास पूर्ण केलेल्या त्यांच्या दोन्ही वारसांना भाईंच्या विचाराचा वारसा चालवावा लागेल. तो विचारांचा वारसा आता नव्या पिढीने पुढे न्यायला हवा. अत्यंत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या एका वृत्तस्ताचा आज अंत झाला असून त्यांनी आचरणात आणलेले वृत्त सर्वांनी जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
- डॉ.श्रीकांत कोकरे,बनाळी, ता. जत,
जि.सांगली 416 404