दरिबडचीतील तरूणाचा खून अनैतिक संबधातून | जत पोलीसांनी लावला छडा ; तिघे संशयित अटकेत

जत,संकेत टाइम्स : दरीबडची(ता.जत) येथील 26 वर्षीय दिलीप महादेव वाघे या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी दरीबडची येथील यशवंत हाक्के, नवनाथ हाक्के व संजय कोकरे या तिघांना जत पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील दरीबडची येथे 26 वर्षीय दिलीप महादेव वाघे या तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आली होती.मयत दिलीप वाघे याचा मृतदेह दरिबडची सिद्धनाथ मार्गावरील वनविभागात दरिबडची हद्दीत मिळून आला होता. 


मयत दिलीप वाघे याचा मोटारसायकलवर पडून अपघातात मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते.
या घटनेनंतर जत पोलिसांनी पंचनामा करून मयत दिलीप वाघे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. यात दिलीप वाघे याचा मृत्यू हा जबर मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले होते.
त्याच्या पाठीवर जबर मारहाणीचे वळ होते तसेच त्याचा हातही मोडला होता. हा अपघात नसून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व त्यांच्या टीमने तपास केला.अवैध वाळू तस्करीतून की अन्य कोणत्या कारणाने खून झाला याचा तपास जत पोलिसांनी केला. मयत दिलीप वाघे याचे गावातील अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता मयत दिलीप वाघे याचा खून अनैतिक सबंधातूनच झाल्याचे उघड झाले. 

गावातीलच यशवंत हाक्के याच्या मुलीसोबत मयत दिलीप वाघे याचे अनैतिक संबंध होते. याच रागातून यशवंत हाक्के, नवनाथ हाक्के व संजय कोकरे यांनी मयत दिलीप वाघे यास जबर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला.तिघांनी याबाबत पोलीसांना कबूली दिली आहे.